छत्रपती संभाजीनगर : छावणी परिसरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत छावणी वाहतूक शाखेच्या हद्दीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिलींद चौक (लिटील फ्लॉवर शाळा) ते मिल्ट्री मेस टी, तसेच छावणी आठवडी बाजाराकडून छावणी हॉस्पिटलमार्गे येणारा रस्ता आणि विसर्जन मार्गाकडे जाणारे अंतर्गत रस्ते मिरवणुकीतील वाहने वगळता इतर वाहनांसाठी बंद राहतील.
वाहनांसाठी पर्यायी मार्ग
१) मिलकॉर्नरकडून छावणीकडे ये-जा करणारी वाहने मोरे चौक–छावणी आठवडी बाजार–आयकर भवन या मार्गाचा वापर करतील.
२) मिलींद चौक (लिटील फ्लॉवर शाळा) मार्गे नगरनाका येथे जाणारी-येणारी वाहने ख्रिस्तनगर–पोलीस ठाणे छावणी–सपोआ छावणी कार्यालयासमोरून नगरनाका या मार्गाने जातील.
३) नगरनाका, मिल्ट्री मेस टी, आयकर भवन मार्गे ये-जा करणारी वाहने महावीर चौक (बाबा पंप) मार्गे शहरात जातील.
ही वाहतूक अधिसूचना पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. नागरिकांनी विसर्जनाच्या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन छावणी वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अधिसूचनेचा भंग करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३१ तसेच अन्य लागू फौजदारी कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.



