
फायनान्स कंपनीचे वसुलीचे 68 हजार 56 रुपये अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची कहाणी, अंगावर चाकूने वार, तोंडात कापड आणि हात-पाय दोरीने बांधल्याचा बनाव… घटना प्रथमदर्शनी गंभीर वाटत असतानाच गंगापूर पोलिसांच्या बारकाईच्या तपासाने या कथेला वेगळीच दिशा मिळाली. घटनास्थळावरील परिस्थिती, तक्रारदाराच्या जबाबातील विसंगती आणि त्याच्या उत्तरांमधील गोंधळ यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली आणि अखेर 68 हजार रुपयांच्या अपहारासाठी रचलेल्या जबरी चोरीचा संपूर्ण बनावाचा पर्दाफाश झाला.
भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि., शाखा गंगापूर येथे किरण पंढरीनाथ वैरागर, रा. पानसलाना, शनिशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर, ह.मु. गंगापूर हा मागील 8 ते 9 महिन्यांपासून फिल्ड असिस्टंट म्हणून काम करीत होता. कंपनीच्या वतीने गंगापूर तालुक्यातील महिला सदस्यांना कर्जाचे वाटप करणे तसेच त्यानंतर कर्जाच्या हप्त्यांची वसुली करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.
दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी किरण वैरागर हा लासूर रोडकडून गंगापूरच्या दिशेने निघाला. काही वेळानंतर त्याने आपल्यासोबत जबरी चोरी झाल्याची माहिती दिली. त्याच्या सांगनेनुसार, शिंदेवाडी फाट्याजवळील आयडीएल इंग्लिश स्कूल परिसरात दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार व्यक्तींनी त्याची मोटारसायकल अडवली. त्याला जबरदस्तीने दुसऱ्या मोटारसायकलवर बसविण्यात आले. त्यानंतर रस्त्यापासून सुमारे 100 फूट अंतरावरील ठिकाणी नेऊन त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. डाव्या हातावर, दंडावर, छातीवर आणि पाठीवर वार करून जखमी केले. त्यानंतर तोंडात कापड कोंबून हात-पाय दोरीने बांधले आणि त्याच्याकडील फायनान्स कंपनीच्या वसुलीचे 68,056 रुपये व मोबाईल फोन घेऊन 04 आरोपी पसार झाल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. गंगापूर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला. मात्र, पोलिसांसमोर केवळ तक्रारदाराची कहाणी नव्हती; त्या कहाणीमागील प्रत्येक दुवा तपासला जात होता. घटनास्थळाची पाहणी, तक्रारदाराने सांगितलेल्या घटनाक्रमाची पडताळणी आणि त्याच्या जबाबातील बारकावे तपासले जाऊ लागले. पोलिसांच्या लक्षात काही बाबी खटकू लागल्या. तक्रारदाराकडून घटनेबाबत विचारणा केली असता त्याची उत्तरे गोंधळलेली येत होती. एका घटनेचे वर्णन करताना त्याच्या बोलण्यात तफावत निर्माण होत होती. त्याने सांगितलेल्या जबरी चोरीच्या घटनाक्रमातील काही बाबी प्रत्यक्ष परिस्थितीशी जुळत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांचा संशय थेट तक्रारदाराकडे वळला.
मात्र, पोलिसांनी घाईघाईने निष्कर्ष काढला नाही. तक्रारदाराला विश्वासात घेऊन घटनेतील प्रत्येक बाब पुन्हा पुन्हा तपासण्यात आली. पोलिसांच्या प्रश्नांची मालिका सुरू झाली आणि त्याच्या जबाबातील विसंगती अधिक स्पष्ट होत गेल्या. अखेर कसून चौकशीदरम्यान त्याने संपूर्ण घटनाक्रमाची कबुली दिली.
ज्या व्यक्तीने स्वतःला चोरट्यांचा बळी असल्याचे सांगितले होते, त्याच व्यक्तीने या कथित लुटीचा बनाव रचण्यात सहभाग घेतल्याचे समोर आले..
किरण वैरागर याचा मित्र रवि ज्ञानदेव दरंदले, रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याने दि. 21 सप्टेंबर रोजी दुपारी किरणला फोन केला होता. पैशांची अडचण असल्याचे सांगत फायनान्स कंपनीचे हप्ते वसुलीचे पैसे अज्ञात चोरट्यांनी लुटल्याचा बनाव करण्याचा कट आखण्यात आल्याचे तपासात समोर आले. किरण वैरागर सायंकाळी सुमारे 6.45 वाजता लासूर रोडकडून गंगापूरच्या दिशेने निघाला. गंगापूरकडे येत असताना शिल्लेगावजवळ त्याला रवि दरंदले आणि त्याचा मित्र विधिसंधर्षबालक रा. शनिशिंगणापूर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हे भेटले. त्यांच्याकडे मोटारसायकल होती. तिघांनी मिळून लासूर ते गंगापूर मार्गावरील शिंदेवाडी फाट्याजवळील आयडीएल इंग्लिश स्कूल परिसरातील जागा निश्चित केली. त्यानंतर ते गंगापूर रोडने पुढे गेले आणि रस्त्यालगतच्या शेतात पोहोचले. रवि दरंदले याने किरणचे हात-पाय दोरीने बांधले, तर विधिसंधर्षबालक याने त्याला मदत केली. त्यानंतर किरणकडे असलेली फायनान्स कंपनीच्या वसुलीची रोकड आणि मोबाईल फोन घेऊन रवि व विधिसंधर्षबालक तेथून निघून गेले. पुढे हीच रक्कम अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने लुटल्याचा त्याने बनाव केला होता.
तक्रारदाराने सांगितलेल्या घटनेतील विसंगती पोलिसांनी हेरल्या आणि त्या विसंगतींच्या आधारे तपासाची दिशा बदलली. सुरुवातीला अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सुरू झालेला तपास काही वेळातच तक्रारदारानेच सांगितलेल्या घटनेत सत्य किती आणि बनाव किती, याचा शोध घेण्याकडे वळला. अखेर पोलिसांच्या कसून चौकशीत संपूर्ण कटाचा उलगडा झाला.
या प्रकरणात भारत फायनान्शियल इन्क्लुजन लि. कंपनीच्या 68,056 रुपयांचा अपहार करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1) किरण पंढरीनाथ वैरागर रा. पानसलाना, शनिशिंगनापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर, ह.मु. गंगापुर 2) रवि ज्ञानदेव दरंदले रा शनिशिंगनापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर 3) विधिसंधर्षबालक रा शनिशिंगनापुर ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे कलम 316(2), 316(4), 61(2), 217 बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर पोलिसांनी केलेल्या या तपासामुळे अज्ञात चोरट्यांकडून झालेल्या कथित जबरी चोरीचे गूढ काही काळातच उकलले आणि फायनान्स कंपनीच्या पैशांच्या अपहारासाठी रचलेला बनाव समोर आला. प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
नमूद कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रकाश जाधव, मा.अप्पर पोलीस अधीक्षक, श्री प्रशांत स्वामी ,मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक, गंगापूर उपविभाग, श्रीमती जानव्हि शेखर ,यांच्या मार्गदर्शनाखाली
1. सलीम अमर चाऊस, पोलीस निरीक्षक
2. विनायक पाटील, सहायक पोलीस निरीक्षक
3. विश्वजीत फरतडे, पोलीस उपनिरीक्षक
4. ज्ञानेश्वर नरोडे, पोलिस अंमलदार
5. प्रकाश सातपुते, पोलीस अंमलदार
6. अजित नागलोत, पोलीस अंमलदार
7. शरद पाटील, होमगार्ड
8. विश्वनाथ दारुंटे, होमगार्ड यांनी केली आहे

