आज आपण सर्व जगाला, प्रत्येक काळात, लहानापासून थोरांपर्यंत, कुठल्याही परिस्थितीत, गांजलेल्या पिडलेल्या व्यक्तीला, यथायोग्य मार्गदर्शन करणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाच्या जन्म दिवसाचा उत्सव हा व्रत म्हणून कसा साजरा करतात, हे आपण पाहूया.
भविष्य पुराणात या व्रताचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमी ही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी होते. (हिंदी भाषिकां मध्ये त्यांचा महिना हा पौर्णिमेला संपतो, त्यामुळे ते भाद्रपद महिन्यातील कृष्ण अष्टमी या दिवशी हे व्रत साजरे करतात.) प्रत्यक्षात हे दोन्ही दिवस एकाच दिवशी येतात.
भविष्य पुराणात असे सांगितले आहे की, ज्यावेळी श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला व त्यांनी आपल्या मातापित्यांना कारागृहातून मुक्त केले, जन्मानंतर पहिल्यांदाच देवकी आणि वसुदेव ही आपली मुले बलराम आणि श्रीकृष्ण यांना प्रथमच पाहत होते. त्यांना आनंद झाला. त्या वेळी तिथे असलेले, कंस वधाने व श्रीकृष्णाच्या पराक्रमाने आनंदीत झालेले, प्रजाजन त्यांना विचारू लागले की, आपला जन्म केव्हा झाला? व आम्ही तो जन्मदिवस साजरा करावा काय?
यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, होय! हा जन्म जन्मोत्सव सर्वांनी साजरा करायला हरकत नाही. प्रत्येकाने हा साजरा करावा. ज्यावेळी सूर्य सिंह राशीत व चंद्र वृषभ राशीत होता, त्या भाद्रपद मासातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीला अर्ध रात्री रोहिणी नक्षत्रावर भगवंताचा अवतार झाला.
भगवान श्रीकृष्णाचा हा जन्मोत्सव सर्वांनी साजरा करावा. हे व्रत केल्याने विश्वात शांती येईल. सुख मिळेल व हे व्रत करणारा रोगमुक्त होईल.
श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात
या व्रतात पहिल्या दिवशी दात घासल्या पासून व्रत धारण करावे. माध्यांनी स्नान करून, एक माता भगवती देवकीचे सुतिका गृह बनवावे. त्याला फुलांनी सजवावे. तिथे गोकुळातील गोप, गोपी घंटा ,मृदंग, शंख व मंगल कलश इत्यादी ठेवावे. श्रुतिका गृहाच्या दाराबाहेर तलवार मुद्गल ठेवावे. भिंतीवर मंगल चिन्हे रेखाटावीत. तिथे षष्ठी देवीची स्थापना करावी. तिला नैवेद्य अर्पण करावा. एका बिछान्यावर निजलेली देवकी असावी.
या साऱ्या प्रतिमा आठ प्रकाराच्या असू शकतात सोने, चांदी, तांबे, पितळ माती, लाकूड, मण्याच्या किंवा चित्राने रेखाटलेल्या. यापैकी कोणतीही एक प्रकारची प्रतिमा तयार करावी.
सुतिका गृहाच्या भिंतीवर वरचे बाजूस देवता, ग्रह नाग, विद्याधर इत्यादी त्यांच्या हाताने पुष्पवृष्टी करताना दाखवावेत. वसुदेवांना सुतीका गृहाच्या बाहेर हातात ढाल तलवार घेऊन रक्षण करताना दाखवावे.
वसुदेव हे, महर्षी कश्यपांचे अवतार आहेत. देवकी माता ही अदीतीचा अवतार आहे. बलदेव शेष नागाच्या अवतार आहे. नंद बाबा दक्ष प्रजापती चे. यशोदा दीतीचा. गर्ग मुनी ब्रह्म देवाचा अवतार आहेत. कंस हा कालनेमीचा अवतार आहे .
कंसाच्या पहारेदारांना सुतिका गृहाच्या अवतीभवती निद्रावस्थेत दाखवावे. गाई व हत्तींना नाचताना दाखवावे. नाचणाऱ्या अप्सरा दाखवाव्यात. यमूनेच कालिया नाग दाखवावा.
यानंतर देवकीचे भक्तीने पूजन करावे. गंध पुष्प अक्षत धूप नारळ डाळिंब सुपारी व स्थानिक ऋतु तील फळांनी नैवेद्य दाखवावा.
यानंतर खालील मंत्राने तिचे स्मरण करावे.
गायद्भिः किन्नराद्यैः सततपरिवृता वेणुवीणानिनादैः
भृङ्गारादर्शकुम्भप्रमरकृतकरैः सेव्यमाना मुनीन्द्रैः ।
पर्यङ्के स्वास्तृते या मुदिततरमनाः पुत्रिणी सम्यगास्तेसा देवी देवमाता जयति सुवदना देवकी कान्तरूपा* ॥
वेणू (बासरी) आणि वीणेच्या मधुर निनादाने किन्नर इत्यादी जिची सतत स्तुती करीत आहेत, तसेच अभिषेकाची पात्रे, आरसे, मंगल कलश आणि चामरे हातात घेतलेल्या श्रेष्ठ मुनींनी जिची सेवा केली जात आहे, अशी देवकी माता सुंदरपणे सजविलेल्या पलंगावर आनंदी मनाने पुत्रासह विराजमान आहे.
अशा सुंदर मुखाची, देवमाता, कमनीय रूपाची देवी देवकीचा जयजयकार असो.
यानंतर अशी कल्पना करावी की माता लक्ष्मी देवकीचे चरण दाबत आहेत. यानंतर लक्ष्मीचे स्मरण करून तिला प्रार्थना करावी ओम नमो देवै महादेवै शिवायै सतत नमः
यानंतर ओम देवकै नम:, ओम वसुदेवाय नम: ,ओम बलभद्राय नम: ,ओम श्री कृष्णाय नम: ,ओम सुभद्रायै नम: ,ओम नंदाय नमः,ओम यशोदायै नमः
असे म्हणत यांच्या प्रतिमांचे वेगवेगळे पूजन करावे.
यानंतर भक्ती भावाने हात जोडून ही प्रार्थना म्हणावी
अनघं वामनं शौरिं वैकुण्ठं पुरुषोत्तमम् ।
वासुदेवं हृषीकेशं माधवं मधुसूदनम् ॥
वाराहं पुण्डरीकाक्षं नृसिंहं दैत्यसूदनम् ।
दामोदरं पद्मनाभं केशवं गरुडध्वजम् ॥
गोविन्दमच्युतं कृष्णमनन्तमपराजितम् ।
अधोक्षजं जगद्बीजं सर्गस्थित्यन्तकारणम् ॥
अनादिनिधनं विष्णुं त्रिलोकेशं त्रिविक्रमम् ।
नारायणं चतुर्बाहुं शङ्खचक्रगदाधरम् ॥
पीताम्बरधरं नित्यं वनमालाविभूषितम् ।
श्रीवत्साङ्कं जगत्सेतुं श्रीधरं श्रीपतिं हरिम ॥
या मंत्राने भगवंताचे ध्यान झाल्यावर योगेश्वराय योग संभवाय योग पत्ते गोविंदाय नमो नमः या मंत्राने भगवंताच्या प्रतिमेला स्नान घालावे यानंतर यज्ञेश्वराय यज्ञ संभवाय यज्ञपत गोविंदाय नमो नमः या मंत्राने गंध धूप दीप अग्य आधी अर्पण करावे यानंतर विश्वास विश्वेश्वराय विश्व संभवाय विश्व पतये गोविंदा नमो नमः या मंत्राने भगवंताला नैवेद्य अर्पण करावा. दिवा दाखवावा. आणि हा मंत्र म्हणावा, *धर्मेश्वराय धर्मपतये धर्मसमभाय गोविंदाय नमो नमः
यानंतर आपण तिथे स्थापलेल्या सर्व मुर्तीचे पूजन करावे. असे केल्याने आपल्याला सगळ्या पापातून मुक्ती मिळते. यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे.
क्षिरोदार्णवसंभूत अत्रिनेत्र समुद्भव/ गृहनार्घ्य शशांकेंदो रोहिण्या सहितो मम
यानंतर हवन करावे व त्यात गुळ आणि तूप यांनी आहुती द्यावी व षष्ठी देवीची पूजा करावी. आपण षष्ठी देवीच्या नावाचा उच्चार सटवी असा करतो. याच वेळेस बालकाचे म्हणजे श्रीकृष्णाचे नामकरण करावे. नवमीच्या दिवशी प्रातःकाळी जगदंबेचाही उत्सव करावा. त्यानंतर अन्नदान करावे.
अशा रीतीने हा सण भक्ती भावाने व विधीपूर्वक साजरा करावा.
हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की
मधुकर बोरीकर
9403061886

