छत्रपती संभाजीनगर, दि.31 (जिमाका)- श्रावण महिन्यात वेरुळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशान्वये दि. १ सप्टेंबर आणि दि.४ ते ८ सप्टेंबर या कालावधीत रात्री ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत वेरूळ येथील भगवान महावीर चौक ते मालोजीराजे भोसले चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद (नो व्हेईकल झोन) राहणार आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भगवान महावीर चौक व मालोजीराजे भोसले चौकाच्या पलीकडे वाहनांच्या पार्किंगसाठी मोकळी जागा व पार्किंग व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. तेथे वाहनधारकांना आपली वाहने पार्किंग करता येतील. मोटार वाहन कायदा कलम ११५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य किंवा केंद्र शासनाच्या मालकीची वाहने तसेच पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. भाविकांनी सहकार्य करावे,असे आवाहनही करण्यात आले आहे.

