ठिकठिकाणी गोड भात, गोड शिरा व पाण्याची व्यवस्था; पोलिसांचा चोख बंदोबस्त
बिडकीन— सालाबादप्रमाणे यंदाही बिडकीन शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि शांततेत पार पडला. बुधवारी सकाळी आठ वाजता नुरानी मस्जिद येथे कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर मदिना मस्जिद, बसस्थानक येथून जुलूस काढण्यात आला. जुलूसमध्ये बिडकीन शहरातील नागरिक, तरुण तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मदिना मस्जिद बसस्थानक येथून निघालेला जुलूस सादत चौक, हवालदार गल्ली, बागवान गल्ली, बिडकीन ग्रामपंचायत, बसस्थानक, शेकटा फाटा मार्गे पुन्हा नुरानी मस्जिद येथे पोहोचला. याठिकाणी जुलूसची सांगता करण्यात आली.
जुलूसच्या मार्गावर ठिकठिकाणी गावातील तरुणांच्या वतीने सहभागी नागरिकांसाठी गोड भात, गोड शिरा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायत सदस्य मिनाजभाई ईनामदार यांच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी भाविकांना फेटे बांधण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने नाशिक येथून नातख्वान सय्यद शहबाज रजा व सय्यद अब्दुल रहमान यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
जुलूसच्या नियोजनासाठी नुरानी मस्जिद कमिटी व मदिना मस्जिद कमिटी यांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले. जुलूसदरम्यान धार्मिक वातावरणासोबतच शांतता व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी नागरिकांनीही सहकार्य केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पाटील पेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजुद्दीन ईनामदार, पंचायत समिती सदस्य लतीफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य मेहमुद शहा, कौसर मिर्झा, काझी मुनिरोददीन, सय्यद असलम, आसिफ पठाण, शौकत सय्यद, शौकत पठाण, आजम शेख, फेरोज शेख, सद्दाम ईनामदार, अफसर शेख, लियाकत पठाण, जाहीर पठाण, अख्तर शहा, शेख अनसर सर, फेरोज ईनामदार, शफीक शेख, गौस सय्यद, महेबुब पठाण, मौलाना निजाम ईनामदार, मौलाना तारिक अन्वर, हाफिज आमीर, हाफिज वसीम, हाफिज इम्रान खान, फारुख सय्यद, शेख शब्बीरभाई, हाफिज ईनामदार, सद्दाम पटेल, अनिस पठाण यांच्यासह बिडकीन शहरातील सर्व स्तरातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जुलूस शांततेत पार पडावा यासाठी बिडकीन पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या नियोजनामुळे संपूर्ण जुलूस शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने बिडकीन शहरात दिवसभर उत्साहाचे आणि धार्मिक वातावरण पाहायला मिळाले.

