एसटी बसमध्ये विसरलेली पर्स पोलिसांनी शोधून काढली; भाविक महिलेने मानले आभार
खुलताबाद प्रतिनिधी : दिल्लीहून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी खुलताबाद येथे आलेल्या महिला भाविकाची एसटी बसमध्ये विसरलेली पर्स खुलताबाद पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप परत मिळाली. पर्समध्ये मौल्यवान दागिने व रोख रक्कम असल्याने महिला भाविकेसाठी ही घटना चिंतेची ठरली होती. मात्र पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत अवघ्या काही वेळात पर्स शोधून काढल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
दिल्ली येथील महिला भाविक कोमल राणा या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांची पर्स एसटी महामंडळाच्या बसमध्ये राहून गेली. पर्समध्ये मौल्यवान दागिने व रोख रक्कम असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने खुलताबाद पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.
महिला भाविकेने प्रवासादरम्यान घेतलेले तिकीट पोलिसांना दाखविल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. तिकीटावरील माहितीच्या आधारे एसटी महामंडळाच्या संबंधित चालक व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या तत्पर प्रयत्नांमुळे संबंधित बस कन्नड आगारात शोधून काढण्यात आली आणि त्यामध्ये असलेली पर्स मिळविण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पर्समधील मौल्यवान दागिने, रोख रक्कम व इतर ऐवज महिला भाविक कोमल राणा यांना सुरक्षितपणे परत करण्यात आला.
पर्स व मौल्यवान दागिने परत मिळाल्यानंतर कोमल राणा यांनी खुलताबाद पोलिसांचे मनापासून आभार मानले. “माझे दागिने परत मिळतील, असे मला वाटले नव्हते. मात्र पोलिसांनी तत्परतेने आणि प्रामाणिकपणे शोध घेतला. मी खुलताबाद पोलिसांची आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या घटनेतून पोलिसांची तत्परता, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. भाविकांच्या अडचणीच्या प्रसंगी पोलीस प्रशासन तत्परतेने मदतीसाठी पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी

