शिऊर प्रतिनिधी : शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंडाळा ते जानेफळ शिवारात रविवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास दरोड्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात सध्या विविध ठिकाणी सप्ताह व धार्मिक कार्यक्रम सुरू असून, या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी शेतवस्तीवरील नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांकडून शेतवस्त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिऊरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसाळे यांनी केले आहे.
शेतवस्तीवरील नागरिकांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. घर बंद करून बाहेर जाताना दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून त्यांचा पाठलाग न करता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
सप्ताह, धार्मिक कार्यक्रम किंवा अन्य सार्वजनिक कार्यक्रमासाठी संपूर्ण कुटुंब घराबाहेर जात असल्यास शेजारी किंवा नातेवाईकांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. रात्रीच्या वेळी शेतवस्ती परिसरात अनोळखी व्यक्ती फिरताना दिसल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही माहिती खात्री करूनच पुढे प्रसारित करावी, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, परिसरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— संतोष मिसाळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिऊर पोलीस ठाणे
महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी

