बालभारतीकडून पुस्तके उपलब्ध होताच १७ माध्यमिक शाळांना तत्काळ पुरवठा
छत्रपती संभाजीनगर दि. २४ ऑगस्ट
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. महानगरपालिकेच्या निधीतून या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची व्यवस्था करण्यात आली असून, बालभारतीकडून पुस्तके उपलब्ध होताच ती तातडीने मनपाच्या १७ माध्यमिक शाळांना वितरित करण्यात आली आहेत.
महानगरपालिकेच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. तर इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या निधीतून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात.
यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता नववी व दहावीची नवीन पाठ्यपुस्तके बालभारतीकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी मनपा शाळांमध्ये गतवर्षीची पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.
दरम्यान, बालभारतीकडे इयत्ता नववी व दहावीची पाठ्यपुस्तके शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी उपलब्ध झाली. त्यानंतर महानगरपालिका शिक्षण विभागाने विलंब न करता ही पुस्तके बालभारतीकडून हस्तगत केली आणि तत्काळ मनपाच्या सर्व १७ माध्यमिक शाळांना वितरित केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली असून, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक गती मिळणार आहे.
ही कार्यवाही मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पाठ्यपुस्तकांची उपलब्धता, हस्तांतरण आणि शाळानिहाय वितरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित केंद्रस्थानी ठेवून आवश्यक शैक्षणिक साहित्य वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

– महाराष्ट्र न्यूज टाइम्स

