महानगरपालिकेचे मा. महापौर श्री. समीर राजुरकर, मा. उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ, मा. सभापती स्थायी समिती श्री. अनिल मकरिये, मा. विरोधी पक्षनेता श्री. समीर साजिद, मा. सभागृह नेता श्री. गोविंद केंद्रे, मा. सभापती वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती श्रीमती डॉ. सुनीता सोळुंके, मा. आयुक्त श्री. अमोल येडगे तसेच मा. अति. आयुक्त – २ श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जीवशास्त्रवेत्ता व साथरोग अधिकारी डॉ. सय्यद सुमैय्या नाज यांच्या अधिपत्याखाली ही मोहीम शहरातील सर्व 10 झोनमध्ये व्यापक स्वरूपात राबविण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य मलेरिया विभागामार्फत डासजन्य आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ‘धडक गप्पी मासे मोहीम’ प्रभावीपणे राबविण्यात आली. दिनांक 19 ऑगस्ट 2026 ते 24 ऑगस्ट 2026 या कालावधीत आरोग्य मलेरिया विभागाच्या वतीने सर्व झोन क्रमांक 1 ते 10 मध्ये ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच डासांच्या अळ्यांचे जैविक पद्धतीने नियंत्रण करण्याच्या उद्देशाने या मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी नवीन गप्पी मासे सोडण्यात आले.
मोहिमेदरम्यान झोन क्रमांक 1 ते 10 मध्ये एकूण 512 ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. गप्पी मासे हे डासांच्या अळ्या खाणारे उपयुक्त जैविक घटक असून, त्यांच्या माध्यमातून डासांच्या उत्पत्तीवर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे ‘गप्पी मासे – जैविक डास नियंत्रणाचे प्रभावी अस्त्र’ या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हा उपक्रम राबविला आहे.
नागरिकांना आवाहन :-
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती व परिसरात पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या साठ्यांची नियमित स्वच्छता करावी तसेच महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करावे.
‘डासांची उत्पत्ती रोखा – डेंग्यू व मलेरियाला आळा घाला’ या उद्देशाने महानगरपालिका आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून डासमुक्त, निरोगी व सुरक्षित छत्रपती संभाजीनगर घडविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
टीप :- गप्पी मासे हवे असल्यास नागरिकांनी आपल्या जवळील मनपा आरोग्य केंद्रातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्याकडे नाव, मोबाईल नंबर व पत्ता नोंदविणे.

