फुलंब्री : (एस के शेख प्रतिनिधी )राजस्थानचे महामहीम राज्यपाल तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे (नाना) यांच्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण, आमदार सुहासभाऊ शिरसाठ तसेच फुलंब्री पंचायत समितीचे सभापती सर्जेराव मेटे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षणप्रेमी, पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.


