
छत्रपती संभाजीनगर : ज्ञानसंदिप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सोनवणे यांचा सेवागौरव सोहळा आज, गुरुवार, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. शासकीय दूध डेअरीजवळील महसूल प्रबोधिनी सभागृहात हा सोहळा होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट राहणार आहेत.
यावेळी ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार डॉ. शेखर मगर संपादित ‘वंचितांचा ज्ञानदीप’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. या ग्रंथातून प्रकाश सोनवणे यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
६८ लेखकांचा सहभाग; ‘वंचितांचा ज्ञानदीप’ प्रकाशित
‘वंचितांचा ज्ञानदीप’ या गौरव ग्रंथासाठी तब्बल ६८ लेखकांनी लेखन केले असून, प्रकाश सोनवणे यांच्या कार्याचा विविध अंगांनी गौरव करण्यात आला आहे. भारतीय दलित पँथरचे संस्थापक तथा ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनीही या ग्रंथासाठी संक्षिप्त टिपण लिहिले आहे.
प्रा. प्रकाश सोनवणे यांनी प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर शहरात शैक्षणिक संस्थेची उभारणी करून वंचित, कष्टकरी आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. आंबेडकरनगर आणि मसणतपुरा परिसरात शाळा उभारून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. जाधववाडी, नारेगाव, ब्रिजवाडी आदी परिसरातील झोपडपट्ट्यांमधील कामगार, श्रमिक आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
३८ वर्षांच्या शैक्षणिक सेवेचा गौरव
प्रकाश सोनवणे यांच्या ३८ वर्षांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा ‘वंचितांचा ज्ञानदीप’ या गौरव ग्रंथातून घेण्यात आला आहे. ३० जून २०२६ रोजी नियत वयोमानानुसार ते मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेबद्दल सेवागौरव सोहळ्यात त्यांचा मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन सपत्नीक गौरव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे तसेच मराठवाड्यातील शिक्षक आमदार विक्रम काळे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे गौरव ग्रंथावर भाष्य करणार आहेत.
शिक्षण, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती राहणार असून डॉ. शेखर मगर, अशोक कांबळे, माजी प्राचार्य विलास पाटील, वसंत राठोड, डॉ. राजेंद्र शेख, बी. बी. शिंदे, संदिप सोनवणे, अभिजित सोनवणे आणि किरणकुमार सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणारे कार्य
प्रकाश सोनवणे यांनी वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा राज्यपालांच्या हस्ते होणारा सेवागौरव हा त्यांच्या कार्याचा सन्मान ठरणार असून, ‘वंचितांचा ज्ञानदीप’ हा गौरव ग्रंथ त्यांच्या कार्याची प्रेरणादायी नोंद ठरणार आहे.
कार्यक्रम : गुरुवार, २० ऑगस्ट २०२६
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : महसूल प्रबोधिनी सभागृह, शासकीय दूध डेअरीजवळ, छत्रपती संभाजीनगर


— महाराष्ट्र न्यूज टाइम्स प्रतिनिधी

