छत्रपती संभाजीनगर : एन-६, सिडको येथील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेचा संपूर्ण परिसर तिरंगी सजावटीने आणि देशप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, समूह सादरीकरणे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. छोट्या विद्यार्थ्यांनी सैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रभक्तांच्या भूमिकांमधून देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांना अभिवादन केले. काही विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेत देशभक्तीचा संदेश दिला, तर सैनिकांच्या वेशातील चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
‘नारी शक्ती – राष्ट्राची भविष्य शक्ती’ या संकल्पनेवर आधारित सादरीकरणातून मुलींनी देशाच्या प्रगतीमध्ये महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. विविध क्षेत्रांतील महिला डॉक्टर, पोलीस अधिकारी, सैनिक, खेळाडू, शिक्षिका आणि अभियंता यांच्या भूमिका साकारत विद्यार्थिनींनी ‘महिला सक्षमीकरण’चा प्रभावी संदेश दिला.
अशोकचक्र, तिरंगा आणि फुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या देशभक्तीपर कलाकृतींनी सांस्कृतिक कार्यक्रमाला आकर्षक स्वरूप दिले. विद्यार्थ्यांच्या विविध वेशभूषा, अभिनय, नृत्य आणि सादरीकरणातून भारताची विविधता, संस्कृती आणि राष्ट्रीय एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व शालेय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून स्वातंत्र्याचा इतिहास, देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला. उत्साह, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी सजलेला हा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.







