छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर हे पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच रविवार, १६ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात धार्मिक स्थळांना भेटी तसेच विविध राजकीय नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटींचे आयोजन करण्यात आले आहे.
दौऱ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शनाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता गोलवाडी फाटा येथील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत.
सकाळी ९.३० वाजता गारखेडा येथील संपर्क कार्यालयात खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर उपसभापती अहिर सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे दाखल होतील.
दुपारी १२.३० वाजता सुभेदारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता ते अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूरकडे रवाना होतील. सायंकाळी ४ वाजता शनिशिंगणापूर येथे श्री शनेश्वराचे दर्शन घेणार असून, त्यानंतर शिर्डीकडे प्रयाण करतील.
सायंकाळी ७ वाजता शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन त्यांच्या दौऱ्याचा धार्मिक टप्पा पूर्ण होणार आहे.
उपसभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने या दौऱ्याकडे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

