भाविकांच्या सुरक्षिततेसाठी १३ ऑगस्ट ते १८ सप्टेंबरदरम्यान वाहतूक मार्गात बदल; पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण : दिनांक १३/०८/२०२६ ते १०/०९/२०२६ या कालावधीत श्रावणमास साजरा होत आहे. या कालावधीत प्रत्येक शनिवारी श्री. भद्रामारोती देवस्थान, खुलताबाद तसेच प्रत्येक सोमवारी श्री. घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ येथे दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात.
खुलताबाद व वेरूळ ही दोन्ही देवस्थाने सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ लगत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे खुलताबाद ते फुलंब्री या मार्गावरही मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते.
तसेच तिसरा श्रावण सोमवार, दिनांक ३१/०८/२०२६ रोजी भाविक वेरूळ येथील तीर्थकुंडातून भोपळ्यात पाणी भरून कावडीद्वारे मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातात. यावेळी भाविक गटागटाने व घोळक्याने सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावरून पायी ये-जा करतात. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने तसेच हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे या कालावधीत वाहतूक कोंडी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्या अनुषंगाने मा. प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३३ (१) (बी) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
त्यानुसार दिनांक १३/०८/२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेपासून ते दिनांक १८/०९/२०२६ रोजी २०:५० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांची सदर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या मार्गावरून जाणाऱ्या सर्व जड वाहनधारकांनी वाहतूक कोंडी होऊ नये तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी खालीलप्रमाणे पर्यायी वाहतूक मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रचलित पूर्वीचा वाहतूक मार्ग
१) कन्नड – वेरूळ – खुलताबाद – दौलताबाद – छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने.
२) फुलंब्री – खुलताबाद – वेरूळ – कन्नडकडे जाणारी वाहने.
३) वैजापूर – शिवूर – पाचपिरवाडी – वेरूळ – खुलताबाद – फुलंब्रीकडे जाणारी वाहने.
बदल करण्यात आलेला पर्यायी वाहतूक मार्ग
१) छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे जातील.
२) फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडकडे जातील.
३) वैजापूर – शिवूर – पाचपिरवाडी – शरणापूर – छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्रीकडे जातील.
श्रावणमासाच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविकांची होणारी पायी वारी आणि वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि वाहतूक कोंडी टाळणे या उद्देशाने सदर वाहतूक बदल करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित जड वाहनधारकांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

