सोयगाव : तालुक्यातील बनोटी येथील गोपाळ श्यामराव बोरसे (वय ३८) यांच्या कथित आत्महत्येचे गूढ उकलण्यात सोयगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तपासानुसार ही आत्महत्या नसून पत्नी ज्योती बोरसे हिने तिचा मित्र गणेश शिंदे याच्या मदतीने गोपाळ यांचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
१८ जुलै रोजी गोपाळ बोरसे यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, शवविच्छेदन अहवालात मृत्यू गळफासामुळे नसून गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पुन्हा पाहणी करून तपासाची दिशा बदलली. पत्नी ज्योती बोरसे हिची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. पती दारूच्या नशेत पत्नी व मुलांना त्रास देत असल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून मित्र गणेश शिंदेच्या मदतीने खून केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर खुनाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले.
या प्रकरणात अकस्मात मृत्यूच्या नोंदीचे रूपांतर खुनाच्या गुन्ह्यात करण्यात आले आहे. ज्योती बोरसे आणि गणेश शिंदे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १० ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर, गजानन दांडगे, अजय कोळी तसेच अंमलदार राजू बर्डे, संजय सिंगल, संदीप सुसर आणि सादिक तडवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या घटनेमुळे बनोटी परिसरासह संपूर्ण सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

