गंगापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील अमळनेर वस्ती येथे गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बुडून दोन चिमुकल्या चुलत बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
मृतांमध्ये आयुष रवींद्र मिसाळ (वय ३ वर्षे) आणि तनवी अविनाश मिसाळ (वय २ वर्षे) यांचा समावेश आहे. आयुष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, तर तनवी ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती.
दोन्ही चिमुकले घरासमोर खेळत असताना कुटुंबीयांची नजर चुकवून जवळच असलेल्या गोदावरीच्या वाढलेल्या पाण्याकडे गेले. बराच वेळ मुले दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर दोन्ही मुले नदीच्या पाण्यात आढळून आली.
नागरिकांनी त्यांना तातडीने पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिकेतून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही चिमुकल्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अमळनेर परिसरात शोककळा पसरली आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता शोकाकुल वातावरणात दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

