छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने ‘क्रीडा वार्षिक नियोजन बैठक व पदक प्राप्त खेळाडूंचे क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम २०२६-२७’ चे आयोजन विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू व अर्जुन पुरस्कार प्राप्तकरता श्रीमती सारिका काळे, उपस्थित होत्या. यावेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कल्पना झरीकर, विविध अधिसभा व क्रीडा मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, महाविद्यालयीन क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तदनंतर लेट श्री डॉ. सुहास यादव क्रीडा संचालक, संत तुकाराम महाविद्यालय, कन्नड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील क्रीडा विभागाच्या विविध उपक्रमांचा व उल्लेखनीय कामगिरीचा आढावा सादर केला.
यावेळी प्रमुख पाहुण्या श्रीमती सारिका काळे यांचा विद्यापीठाच्या वतीने सन्मान करण्यात आला. आपल्या प्रेरणादायी मनोगतात त्यांनी खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, शिस्त, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.
सेवानिवृत्त क्रीडा संचालकांचा गौरव
विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या सेवानिवृत्त क्रीडा संचालक व प्राध्यापकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. डॉ. अपसर शेख, डॉ. पंढरीनाथ रोकडे, डॉ. नेताजी मुळे, डॉ. बाळासाहेब धोंडे, डॉ. विजय पवार आणि डॉ. संध्या ठाकरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जिल्हा क्रीडा पदाधिकाऱ्यांचाही सन्मान
विद्यापीठाच्या क्रीडा उपक्रमांना जिल्हास्तरावर सातत्याने सहकार्य करणाऱ्या जिल्हा क्रीडा अध्यक्ष व सचिवांचाही यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वामुळे व सहकार्यामुळे विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धा आणि विविध क्रीडा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पदक विजेत्या खेळाडूंचा गौरव
खेलो इंडिया इंटर युनिव्हर्सिटी गेम्स, पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धा, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा तसेच क्रीडा महोत्सव २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून विद्यापीठाला पदके व मान मिळवून देणाऱ्या खेळाडूंचाही यावेळी गौरव करण्यात आला. डॉ. फेरोज सय्यद यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला, तसेच डॉ. मधुकर वाकळे यांनी पदक विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक करून खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संचालक व महाविद्यालयांनी एकत्रितपणे काम करून विद्यापीठाचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक अधिक उंचवावा, असे आवाहन केले.
तसेच विद्यापीठात 100 बेडचा पुरुष खेळाडूंसाठी व 100 बेडचा महिला खेळाडूंसाठी सेपरेट होस्टेल येत्या पुढील वर्षात बांधण्याचा मानस दर्शविला, तसेच राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या विद्यापीठ सलग्नित महाविद्यालय व विद्यापीठ प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विद्यापीठामार्फत पन्नास हजार रुपये वार्षिक स्कॉलरशिप देण्यात येईल असी घोषणा केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात
अखिल भारतीय विद्यापीठ आयोगाच्या पात्रता व सहभागा विषयी नवीन नियमावलीची माहिती सर्वाना देण्यात आली. तसेच, चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नवीन जिल्हा निहाय क्रीडा सचिव व अध्यक्ष यांची सर्वांमते निवड करण्यात आली.
व, चालू शैक्षणिक वर्षासाठी अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजनाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागातील अधिकारी, कर्मचारी, क्रीडा संचालक, प्रशिक्षक श्री सुरेंद्र मोदी, श्री किरण शूरकांबळे, श्री रामेश्वर विधाते, श्री मोहन वहीलवार व सर्व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अभिजीत सिंह दिख्खत यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. मसूद हाश्मी यांनी केले.



