‘बीएस्सी मेडिकल इमॅजिंग रेडिऑलॉजी’ नवीन व्यवसायामिभूख अभ्यासक्रम
– दिनदयाळ केंद्रासोबत बजाज रुग्णालयतही प्रशिक्षण मिळणार
छत्रपती संभाजीनगर, दि.०८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिनदयाल कौशल्य केंद्र व कमलनयन बजाज रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. दोन्ही संस्थाच्या सहयोगातून बी.एस्सी (मेडिकल इमेजिंग अॅण्ड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी) हा व्यवसायाभिमूख अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एनईपी-२०२० कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ’एईडीपी-२०२०’ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात दिनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात (डीडीयुकेके) चार वर्षाचा (आठ सत्र) बी.एस्सी-मेडिकल इमॅजिंग अॅण्ड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी हा अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या संदर्भात सामंजस्य करार (एमओयु) करण्यासाठी व्यवस्थापन परिषद कक्षात प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.सात) बैठक झाली. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, संचालक डॉ.भारती गवळी, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भास्कर साठे, डॉ कुणाल दत्ता यांची उपस्थिती होती. सदर सामंजस्य करारावर कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर तसेच कमलनयन बजाज हॉस्पिटलचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) डॉ. जॉर्ज नोएल फर्नांडिस यांनी स्वाक्षरी केली. तसेच डॉ.अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव, शीतल आनंदगावकर, कृष्णा जाधव आदी उपस्थित होते. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांचीही सर्व पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि उद्योग-संलग्न शिक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कमलनयन बजाज हॉस्पिटल यांच्यात बी.एस्सी. मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी (B.Sc. Medical Imaging and Radiology Technology – MIRT) या अभिनव पदवी अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. सदर अभ्यासक्रम शैक्षणिक ज्ञान आणि प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षण यांचा प्रभावी संगम घडवून विद्यार्थ्यांना आधुनिक आरोग्यसेवा क्षेत्रासाठी सक्षम बनविणारा ठरणार आहे. दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र, तसेच विद्यापीठातील विविध विभागातील प्राध्यापक प्रा अमोघ सांबरे, प्रा विशाल उशीर, प्रा रत्नदीप हिवराळे, डॉ संजय शिंदे उपस्थित होते.
व्यावसायिक प्रशिक्षण मिळणार
बी.एस्सी. मेडिकल इमेजिंग अँड रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी हा चार वर्षांचा, आठ सत्रांचा आणि १७६ क्रेडिट्सचा अभ्यासक्रम असून तो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या तत्त्वांनुसार विकसित करण्यात आला आहे. आधुनिक निदान तंत्रज्ञान, वैद्यकीय प्रतिमांकन (Medical Imaging), रेडिओलॉजिकल विज्ञान आणि क्लिनिकल कौशल्यांचा समन्वय साधून प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रसंगी मान्यवरांनी सांगितले की, उच्च शिक्षण संस्था आणि आरोग्यसेवा क्षेत्र यांच्यातील हे सहकार्य विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय प्रतिमांकन तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देईल. यामुळे विद्यार्थ्यांची व्यावसायिक क्षमता, रोजगारक्षमता आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान अधिक बळकट होईल. भविष्यातील कुशल आणि तंत्रज्ञानसज्ज आरोग्यसेवा मनुष्यबळ घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्र (DDUKK) मार्फत करण्यात येणार आहे. कौशल्याधारित शिक्षणाच्या क्षेत्रात दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्राने उद्योग, सेवा क्षेत्र आणि विविध व्यावसायिक संस्थांशी सातत्याने सहकार्य करत विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख आणि समाजोपयोगी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिक्षण आणि प्रत्यक्ष कार्यानुभव यांतील दरी कमी करून समाज आणि प्रदेशाच्या विकासासाठी उपयुक्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी केंद्र सातत्याने कार्यरत आहे.

