छत्रपती संभाजीनगर –
छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका झोन क्रमांक ७ कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी इसम कुणाल मनोहर कविकर (वय २७, रा. गजानन नगर, गारखेडा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी महानगरपालिका झोन क्रमांक ७ कार्यालयात करण्यात आली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने १० जुलै २०२६ रोजी आपल्या मुलाचे जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी महानगरपालिका झोन क्रमांक ७ येथे अर्ज केला होता. त्यानंतर आरोपी कुणाल कविकर याने जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी ६ हजार रुपये लागतील, असे सांगून पैशांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २.०६ ते २.२४ या वेळेत करण्यात आली. या पडताळणीत आरोपीने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. दुपारी २.५६ ते ३.०१ या वेळेत महानगरपालिका झोन क्रमांक ७ कार्यालयात आरोपीने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा नोंद होताच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे एसीबीने सांगितले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी पर्यवेक्षण केले. सापळा पथकात पोलीस हवालदार राजेंद्र नंदिले, पोलीस अंमलदार सचिन बारसे आणि चालक पोलीस अंमलदार रामेश्वर ताठे यांचा सहभाग होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशीकांत सिंगारे आणि प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

