वाळूज, दि. 31 जुलै 2026 : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत सावित्रीबाई फुले तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्र, वाळूज यांच्या वतीने पोलीस स्टेशन वाळूज येथे माविम मित्र मंडळ व पोलीस इंटरफेस बैठक आयोजित करण्यात आली. माविम जिल्हा समन्वय अधिकारी मा. श्री. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. शिवचरण पांढरे उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक पांढरे यांनी नशामुक्ती प्रतिबंध, महिलांवरील अत्याचार तसेच ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी याबाबत मार्गदर्शन केले. महिलांना कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने 112 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 112 वर कॉल केल्यानंतर संबंधितांचे लोकेशन पोलिसांना प्राप्त होत असल्याने मदत मिळणे सुलभ होते. “महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव तुमच्या सोबत आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस निरीक्षक पांढरे यांनी माविम व CMRCच्या कार्याची माहिती जाणून घेतली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच नशामुक्ती अभियानासाठी शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करून त्यामध्ये पालकांनाही सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सुचविले.
महिलांना विविध योजनांची व उपक्रमांची माहिती मिळावी यासाठी CMRCकडून माहिती पुस्तिका व जनजागृतीपर पोस्टर्स उपलब्ध करून देण्यात आले. तसेच भविष्यात CMRCच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक पांढरे यांनी दिले.
बैठकीस विविध गावांतील माविम मित्र मंडळ सदस्य, CMRC कर्मचारी तसेच पोलीस स्टेशनचे शेळके सर, गांगर्डे सर, देवरे सर आणि RGB सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॅनेजर यांनी केले, तर सहयोगिनी यांनी आभार प्रदर्शन केले.
महिला सुरक्षा, नशामुक्ती आणि जनजागृतीसाठी माविम व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेली ही बैठक महिलांसाठी मार्गदर्शक व उपयुक्त ठरली.





