छत्रपती संभाजीनगर, : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कामाचा सविस्तर आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी प्रत्येक टप्प्यातील काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचे नियमित परीक्षण करून प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी रणजीत पाटील, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मंजुषा मिसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, तहसीलदार के. के. भदाने यांच्यासह सर्व संबंधित मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत एसआयआर कार्यक्रमांतर्गत बीएलओ यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराची माहिती प्रत्यक्ष पडताळणे, गणना फॉर्म अचूकपणे भरणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, प्राप्त अर्जांची वेळेत छाननी करून प्रलंबित बाबी तातडीने निकाली काढणे आणि कोणताही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.
जी. श्रीकांत म्हणाले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने जबाबदारीची जाणीव ठेवून काम करावे. अपात्र नोंदी नियमानुसार व वेळेत वगळाव्यात, तर पात्र मतदारांची नावे अचूकपणे समाविष्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे. कामात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक स्तरावर प्रभावी समन्वय राखावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. बीएलओ, निवडणूक शाखा, तहसील प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून निर्धारित वेळापत्रकानुसार सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत तसेच प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करावा, असे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनीही मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सादरीकरणाद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्या प्रगतीची माहिती दिली. बैठकीस एसआयआर संबंधित कामकाज पाहणारे अधिकारी उपस्थित होते.
- Home
- व्हिडिओ
- छत्रपती संभाजीनगर
- सामाजिक
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- उद्योग – व्यापार
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- मनोरंजन
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एसआयआर कामाचा घेतला आढावा
Related Posts
Add A Comment

