छत्रपती संभाजीनगर : तक्रारदाराच्या अर्जावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून, सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. संबंधित पोलीस उपनिरीक्षकाने तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे पंचांसमक्ष मान्य केल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका ६० वर्षीय पुरुष तक्रारदाराने तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या अर्जावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच गुन्ह्यातील आरोपींना अटक करून गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आरोपी चंद्रकांत कामठे (वय ३८ वर्षे), पोलीस उपनिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांनी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद होते.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार नोंदवली. त्यानंतर ११ मार्च २०२६ रोजी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी तसेच पोलीस निरीक्षक श्री. पवार यांच्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे आणि तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक पवार यांची भेट न झाल्याने तक्रारदाराला १२ मार्च रोजी पुन्हा पाठविण्यात आले. मात्र, त्यावेळीही त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर आरोपीला संशय आल्याने त्याने तक्रारदाराची भेट टाळल्याचे तसेच पोलीस निरीक्षक पवार यांची संबंधित ठिकाणाहून बदली झाल्याने लाचेची रक्कम स्वीकारली जाणार नसल्याचे तक्रारदाराने दिलेल्या जबाबात नमूद आहे. त्यामुळे लाच स्वीकारण्याची प्रत्यक्ष कारवाई न झाल्याने संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान आरोपीच्या अंगझडतीत एक मोबाईल फोन मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. या मोबाईलचे विश्लेषण करण्यात येत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे करीत आहेत.
या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सिंगारे आणि पोलीस उपअधीक्षक श्री. प्रशांत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस हवालदार रविंद्र काळे यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणताही खाजगी इसम शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीसाठी संपर्क :
टोल फ्री : १०६४
व्हॉट्सॲप : ७७२०८९१०६४

