मुंबई, दि. २४ जुलै : नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या विद्यापीठाशी हे महाविद्यालय संलग्न राहणार असून दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
या महाविद्यालयाचा फायदा विदर्भातील ११ जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. फळे, भाजीपाला आणि फुलांचे उत्पादन तसेच त्यावर आधारित प्रक्रिया व मूल्यवर्धनाच्या क्षेत्रातील शिक्षण आणि संशोधनाला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे. महाविद्यालयासाठी ५१ नियमित पदांनाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.



