छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १६ ते २२ जुलै या कालावधीत ‘देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह’ विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहाचे आयोजन स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांच्या पुढाकाराने शहरातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने आयोजित भगवान श्री जगन्नाथ रथयात्रेत सहभागी झालेल्या हजारो भाविकांना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रथयात्रेच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला.
भगवान श्री जगन्नाथांची ही भव्य रथयात्रा गांधी चौक, सराफा बाजार रोड, मच्छली खडक, गुलमंडी, संभाजीपेठ, नागेश्वरवाडी, निराला बाजार, समर्थ नगर, भाग्यनगर आदी प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत इस्कॉन मधुवन येथे पोहोचली. विविध ठिकाणी नागरिक व भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भगवान जगन्नाथांचे दर्शन घेतले आणि रथयात्रेचे स्वागत केले. अखेरीस इस्कॉन मधुवन येथे महाआरतीनंतर रथयात्रेची भक्तिमय वातावरणात सांगता झाली.
‘देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताह’ अंतर्गत पुढील काही दिवसांतही विविध सामाजिक, धार्मिक व जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

