छत्रपती संभाजीनगर, दि.१३(प्रतिनिधी)-अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आणि त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी जिल्ह्यास्तरावर अल्पसंख्याक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर काम करण्यासाठी जिल्हयातील अल्पसंख्याकांसाठी कार्यरत असलेल्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीं यांनी २७ जुलै २०२६ पर्यंत अर्ज दाखल करावेत.
इच्छुक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी विहित नमुन्यात आपला प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावात संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र आणि संबंधित प्रतिनिधीने अल्पसंख्याक समाजासाठी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक कार्याचा सविस्तर तपशील असणे अनिवार्य आहे.
पूर्ण भरलेले प्रस्ताव २७ जुलै, २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालय येथे संपर्क करावा असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

