फुलंब्री | एस के शेख प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज टाइम्स
आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (आण्णा) यांच्या दिंडीला फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.
या दिंडीत छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील विविध गावांतील शेकडो वारकरी भक्तिभावाने सहभागी झाले असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात दिंडी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी (बोचरे आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वारीची परंपरा जपत आहे. वारकऱ्यांच्या निवास, भोजन, आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधांचे उत्तम नियोजन करण्यात येते. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत हरिपाठ, कीर्तन, अभंग आणि अखंड नामस्मरणाच्या वातावरणात ही दिंडी महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे जतन करत पुढे सरकत आहे.
यावेळी आमदार अनुराधा चव्हाण यांनी ह.भ.प. सोमनाथ महाराज चौधरी यांच्या सेवाभावी कार्याला सलाम करत दिंडीतील सर्व वारकरी माऊलींना पंढरपूरच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवा, शिस्त आणि अध्यात्मिक परंपरा ही महाराष्ट्राची अमूल्य सांस्कृतिक ओळख असल्याचेही नमूद केले.



