छत्रपती संभाजीनगर, दि.१०(जिमाका)- जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत नशामुक्त व बालविवाहमुक्त छत्रपती संभाजीनगर पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. पोलीस, शिक्षण, महिला बालकल्याण इ. विभागही या मोहिमेत सहभागी होणार असून सोमवार दि.१३ पासून सुरु होणाऱ्या या पंधरवाड्यात जनजागृती करण्यात येणार आहे. शुक्रवार दि.३१ जुलै पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचे उद्घाटन सोमवार दि.१३ रोजी मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड येथे सकाळी साडेदहा वा. होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे हे राहणार असून अध्यक्षस्थानी महापौर समीर राजूरकर, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे राहणार आहेत.यावेळी महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अध्यक्ष मिन्नू पी.एम., पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अभिनव बालुरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, प्रादेशीक उपायुक्त डॉ. दीपक खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) आश्विनी लाठकर, पोलीस उपअधीक्षक (अंमलीपदार्थ विरोधी टास्क फोर्स) साईनाथ ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब अरवत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे, नशामुक्त भारत अभियान जिल्हा समिती सदस्य विलास चंदने यांनी केले आहे.

