छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने जायकवाडी येथील नवीन योजनेअंतर्गत जंक्शन मुघूल ते नक्षत्रवाडी WTP येथून आज सकाळी ६.३० वाजेपासून पाण्याचा उपसा सुरू केला आहे. यामुळे शहराला दररोज सुमारे ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून, शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार अतिरिक्त शहर अभियंता, पाणीपुरवठा अभियंता तसेच संबंधित उपअभियंते व सहाय्यक अभियंत्यांची बैठक घेऊन पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना आवश्यक प्रमाणात आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे.
सध्या शहरातील विविध ESR (Elevated Service Reservoir) आणि GSR (Ground Service Reservoir) जलकुंभांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेतील पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील पाणी वितरण अधिक प्रभावी होण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.
महापालिकेने नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या नियोजनात सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, नव्या योजनेमुळे आगामी काळात शहरातील पाणीटंचाई कमी होऊन नागरिकांना अधिक नियमित पाणीपुरवठा मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
– माहिती : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (प्रेस नोट)

