छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करून स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून शहरात ‘विशेष संयुक्त पाहणी पथके’ कार्यरत करण्यात आली असून, या मोहिमेची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
महानगरपालिकेने शहरभर २९ विशेष संयुक्त पथके नियुक्त केली आहेत. प्रत्येक पथकात स्वच्छता निरीक्षक, नागरिक मित्र पथक, आयईसी (IEC) सुपरवायझर आणि वाहन सुपरवायझर यांचा समावेश आहे. ही पथके दर सोमवार व गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, दुकाने, पानटपऱ्या आणि व्यापारी परिसराची अचानक तपासणी करतात.
कशाची होते तपासणी?
पथकांकडून दुकानासमोरील स्वच्छता, ओला व सुका कचरा स्वतंत्र डस्टबीनमध्ये ठेवला जातो का, घंटागाडीतच कचरा दिला जातो का तसेच प्रतिबंधित सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर होत आहे का, याची काटेकोर तपासणी केली जात आहे.
आयुक्तांचा थेट सहभाग
मोहिमेदरम्यान आयुक्त अमोल येडगे स्वतः रात्री शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवरही तातडीने कारवाईचे आदेश दिले जात आहेत. या संपूर्ण मोहिमेचे समन्वयक उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) नंदकिशोर भोंबे आहेत.
दोन दिवसांत १ लाखांचा दंड
संयुक्त पथके रस्त्यावर उतरताच नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. सोमवार आणि गुरुवार या दोन दिवसांतच तब्बल १ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, टीव्ही सेंटर, सेंट्रल नाका, चिश्तिया चौक यांसह १३ व्यापारी प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली. एका दिवशी १३ प्रभागांतून ३८ हजार रुपयांचा दंड वसूल झाला असून, प्रभाग क्रमांक ५ आणि १५ मध्ये प्रत्येकी ६ हजार रुपयांचा सर्वाधिक दंड आकारण्यात आला.
“स्वच्छतेत देशात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार”
याबाबत बोलताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छतेत देशात अग्रस्थानी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ नियम करून चालणार नाही, तर नागरिक आणि व्यापाऱ्यांचा सक्रिय सहभागही आवश्यक आहे. प्रारंभी जनजागृतीवर भर देण्यात येईल; मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”
व्यापारी संघटनांचे स्वागत
स्थानिक व्यापारी संघटनांनी या मोहिमेचे स्वागत करत, शहर स्वच्छ राहणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कचरा वर्गीकरण आणि योग्य व्यवस्थापनासाठी व्यापारी पूर्ण सहकार्य करतील, मात्र प्रामाणिक व्यापाऱ्यांना अनावश्यक त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चौकट : थेट संवादावर भर
महापालिका आयुक्तांनी आपल्या सकाळच्या ‘मॉर्निंग वॉक’चे रूपांतर शहर पाहणी मोहिमेत केले आहे. या पाहणीदरम्यान स्वच्छता व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी केली जात असून, हलगर्जी कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाईचे निर्देश दिले जात आहेत. त्याचबरोबर व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधून कचरा वर्गीकरण, वेळेवर संकलन आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. दंडात्मक कारवाई, जनजागृती आणि लोकसहभाग यांचा प्रभावी समन्वय साधत “स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध छत्रपती संभाजीनगर” घडविण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

