छत्रपती संभाजीनगर : गायनासोबत अनेक वाद्ये एकाचवेळी वाजवत एकपात्री ऑर्केस्ट्राचा अनोखा आविष्कार सादर करणारे संगीत अध्यापक धीरज आर. भालेराव यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या कलेमुळे रसिकांची मनं जिंकली आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि आनंदी जीवन जगण्याचे रहस्य आपल्या कार्यक्रमातून उलगडणारे धीरज भालेराव यांचा ‘वन मॅन म्युझिक आर्मी’ हा प्रयोग अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहे.
या यशामागे अनेक वर्षांची मेहनत, अखंड रियाज आणि संगीतावरील निष्ठा आहे. भारतात प्रथमच एकाच कलाकाराने गायनासह विविध वाद्यांचे सादरीकरण करणारी अनोखी एकपात्री ऑर्केस्ट्रा शैली त्यांनी विकसित केली आहे. या कार्यक्रमात ते एका हाताने सिंथेसायझर, दुसऱ्या हाताने डग्गा, चाटी, कोंगो आणि डफ यांसारखी तालवाद्ये वाजवतात. त्याचवेळी दोन्ही पायांच्या सहाय्याने साईड रिदम साकारत एका पायाने खंजिरी तर दुसऱ्या पायाने ड्रम व चोक थाळी वाजवतात. या सुरेल वाद्यसंगतीला सुमधुर गायन आणि प्रभावी सूत्रसंचालनाची जोड मिळाल्याने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समाजहित आणि देशहिताचा उद्देश असेल तर केवळ आयोजन खर्च व ऐच्छिक देणगीच्या मर्यादेतही ते कार्यक्रमाचे सादरीकरण करतात.
धीरज भालेराव यांनी एम.ए. (शास्त्रीय संगीत), नाट्यशास्त्र पदविका तसेच शास्त्रोक्त तबला मध्यमा परीक्षा पूर्ण केली आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथील हिमायत बाग परिसरातील युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात संगीत अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सकाळच्या सत्रात माध्यमिक विद्यार्थ्यांना तर दुपारच्या सत्रात संस्थेच्या डी.एड. आणि ए.टी.डी. विद्यार्थी-शिक्षकांना संगीताचे प्रशिक्षण देण्याची अतिरिक्त जबाबदारी ते समर्थपणे सांभाळतात. याच सातत्यपूर्ण अध्यापन आणि रियाजातून ‘वन मॅन म्युझिक आर्मी’ या अनोख्या कला आविष्काराचा जन्म झाला.
संगीत साधनेबाबत आपले विचार मांडताना धीरज भालेराव म्हणतात, “संगीताचे मुख्य अंग म्हणजे लय, आणि ही लय संपूर्ण विश्वात सामावलेली आहे. दिवस-रात्र, सूर्योदय-सूर्यास्त, वाऱ्याची झुळूक, झाडांची वाढ, वाहणाऱ्या पाण्याचा नाद—सर्व काही एका विशिष्ट लयीत घडत असते. माणसाचा श्वास, चालणे आणि जीवनही त्याच लयीचे अनुसरण करते.”
ते पुढे सांगतात, “कैरीचे लगेच आंब्यात रूपांतर होत नाही. त्यासाठी निसर्गाला वेळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे जीवनातील कटुता, नैराश्य आणि अडचणीही काळाच्या ओघात दूर होतात. संयम, सबुरी आणि सकारात्मक विचार ठेवले तर नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होतो. नियमित व्यायाम जसा शरीराला निरोगी ठेवतो, तसाच नियमित संगीत रियाज मनाला सकारात्मक ऊर्जा देतो.”
संगीत, संस्कार आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा संदेश देणारा धीरज भालेराव यांचा ‘वन मॅन म्युझिक आर्मी’ हा अनोखा प्रयोग आज राज्यभरातील रसिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक-दिनेश गायके

