छत्रपती संभाजीनगर जुलै2026 | (प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज टाइम्स)
गीता भवन, एन-५ सिडको येथे सुप्रसिद्ध साहित्यिक माधव मनोहर जोशी लिखित “पुरुषस्य भाग्यम्” या बहुचर्चित कादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि भव्य कवी संमेलन आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साहित्य, संस्कृती आणि कवितेचा सुरेख संगम अनुभवण्यासाठी शहरातील साहित्यप्रेमी, कवी, लेखक, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी कुलगुरू, प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर यांच्या शुभहस्ते झाले. प्रा. धारूरकर यांनी आपल्या भाषणात साहित्य हे समाजाचे विचारविश्व समृद्ध करणारे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. ज्ञान, संस्कार आणि सामाजिक जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी वाचन संस्कृती अधिक बळकट होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विविध शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते एक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात.
यावेळी प्रमुख पाहुणे सुधीर कोर्टीकर यांनी साहित्य हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत नवोदित लेखक आणि कवींनी सामाजिक भान जपत दर्जेदार लेखन करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या भव्य कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ हास्यकवी प्रा. विजय पोहनेरकर होते. त्यांनी मराठी कवितेची समृद्ध परंपरा, विनोद, सामाजिक आशय आणि नव्या पिढीतील साहित्यिकांनी आपल्या कार्यातून संदेश दिला आहे . त्यांच्या ओघवत्या शैलीने उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी “पुरुषस्य भाग्यम्” या कादंबरीचे लेखक माधव मनोहर जोशी यांनी आपल्या साहित्यनिर्मितीमागील प्रेरणा, सामाजिक अनुभव आणि कादंबरीचा आशय उलगडून सांगितला. जीवनसंघर्ष, मानवी नातेसंबंध आणि नियती यांचे वास्तववादी चित्रण या कादंबरीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पुस्तकाचे प्रकाशन ज्योतिर्मय प्रकाशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले. प्रकाशन संस्थेचे संजय काशिनाथ व्यापारी यांनी गुणवत्तापूर्ण साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा आपला सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचे सांगितले.
कवी संमेलनात अनेक नामवंत तसेच नवोदित कवींनी विविध विषयांवरील कविता सादर करून रसिकांची भरभरून दाद मिळवली. सामाजिक जाणीवा, देशप्रेम, निसर्ग, मानवी नाती, अध्यात्मिक, जात्यावरच्या ओव्या आणि संस्कार या विषयांवरील काव्यरचना विशेष गाजल्या.
यावेळी एका योगराज या लहान विद्यार्थ्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अत्यंत प्रभावी कविता सादर केली. “मोबाईलपासून दूर राहा, पुस्तके वाचा, स्वतः कविता लिहा आणि सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा” असा संदेश त्या मुलाकडून मिळाला,उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. भविष्यातील पिढीने तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत साहित्य, वाचन आणि लेखनाकडे वळावे, असा प्रेरणादायी संदेश प्रकाशक संजय व्यापारी यांनी दिला व सर्व शिक्षकांना आवाहन केले की आपल्या शाळेतील मुलांना आपापल्या कल्पनेप्रमाणे लेखनासाठी प्रेरित करा. विशेष म्हणजे त्यांचे लिखाण आपल्या ज्योतिर्मय दैनिकात कुठलाही मोबदला न घेता प्रसिद्ध करण्याची जबाबदारी घेतली आहे.
कार्यक्रमाला साहित्य, शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून उपस्थित साहित्यप्रेमींनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुस्तक प्रकाशन आणि कवी संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यविश्वाला नवसंजीवनी देणारा हा सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.
महाराष्ट्र निवास टाइम्स
संपादक-दिनेश गायके

