छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार, मा. अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ जुलै २०२६ रोजी आयएमए हॉल, समर्थनगर येथे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उच्च दर्जाची स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त-२ श्रीमती कल्पिता किशोर पिंपळे यांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या सर्व सफाई कर्मचारी, सेवक व सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ज्ञानेश्वर चौधर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता तसेच आरोग्य केंद्रांतील दैनंदिन स्वच्छता व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ, सुरक्षित व नागरिकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले.
या मार्गदर्शन बैठकीस राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे कार्यरत सुमारे १५० सफाई कर्मचारी, सेवक व सेविका उपस्थित होते.
यापुढे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वच्छतेचे निर्धारित निकष काटेकोरपणे पाळले जातील, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त-२ यांनी दिले. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा आढळून येईल, त्या प्रकरणी संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
यासोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश व ओळखपत्र अनिवार्यपणे परिधान करावे, तसेच त्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या.
बैठकीच्या समारोपावेळी उपस्थित सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी “स्वच्छ आरोग्य केंद्र, निरोगी नागरिक” या संकल्पनेला साकार करण्याचा संकल्प व्यक्त करत स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. “मी माझे आरोग्य केंद्र सदैव स्वच्छ व सुस्थितीत ठेवेन. कोणतेही काम कमी दर्जाचे नसते याची जाणीव ठेऊन मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल”, अशी प्रतिज्ञा घेतली त्यामुळे सफाई कर्मचारी यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण होऊन आपले आरोग्य केंद्र स्वच्छ राखण्याचा मानस सफाई कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

