वैजापूर (तालुका प्रतिनिधी) : वैजापूर तालुक्यातील वाकला येथील जिल्हा परिषद प्रशालेत गेल्या दोन वर्षांपासून तब्बल ८ शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदने दिली तसेच वेळोवेळी आंदोलनेही केली, मात्र शिक्षकांची नियुक्ती न झाल्याने अखेर संतप्त गावकऱ्यांनी शाळेलाच कुलूप ठोकून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आजही पावसाची रिपरिप सुरू असतानाही विद्यार्थी व ग्रामस्थ शाळेच्या गेटसमोर उभे राहून आपला विरोध नोंदवत आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला असून, तातडीने रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे.
संबंधित शिक्षण विभागाने याची तातडीने दखल घेऊन रिक्त पदे भरावीत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक- दिनेश गायके

