छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
साहित्यप्रेमींसाठी आजचा दिवस विशेष ठरणार असून सुप्रसिद्ध साहित्यिक मा. माधव मनोहर जोशी लिखित ‘पुरुषस्य भाग्यम्’ या बहुप्रतीक्षित कादंबरीचा प्रकाशन सोहळा आणि त्यानिमित्ताने भव्य कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्यिक सोहळ्याला शहरातील साहित्यिक, कवी, वाचक आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कादंबरीचे प्रकाशन प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. ते प्रसिद्ध विचारवंत, लेखक व कुलगुरू म्हणून ओळखले जातात. कार्यक्रमात त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उपस्थितांना मिळणार आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध हायकूकार प्रा. विजय पोहनरेकर भूषविणार आहेत. या कवी संमेलनात मान्यवर कवी आपल्या दर्जेदार काव्यरचना सादर करणार असून साहित्य रसिकांना कवितेची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.
हा साहित्यिक सोहळा शुक्रवार, दि. ३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता, गीता भवन, एन-५, सिडको, जिजामाता शाळेसमोर, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
ज्योतिर्मय प्रकाशन, पुणे प्रकाशक श्री संजय व्यापारी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी लेखक माधव मनोहर जोशी यांनी सर्व साहित्यप्रेमी, कवी, वाचक आणि नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहून साहित्य संस्कृतीचा हा अविस्मरणीय सोहळा यशस्वी करण्याचे सप्रेम निमंत्रण दिले आहे. साहित्य, संस्कृती आणि काव्य यांचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमाकडे साहित्यविश्वाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक- दिनेश गायके

