आडगाव बु. (एस के शेख प्रतिनिधी): आडगाव बु. ते मालोदेवडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्याची उंची जास्त झाल्यामुळे गावातील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला आहे. परिणामी गावातील मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्य रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यामुळे गावात ये-जा करणे कठीण झाले असून, शाळेजवळ पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच तुंबलेले पाणी शाळेच्या परिसरात शिरत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळत असल्याने दूषित पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी थेट तुंबलेल्या पाण्यात बसून जलसत्याग्रह आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत, “जोपर्यंत तुंबलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा केला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी संबंधित विभाग व जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र न्यूज टाईम
संपादक- दिनेश गायके

