छत्रपती संभाजीनगर (एस के शेख प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बोगस खतांविरोधात कृषी विभागाने मोठी कारवाई करत लाडसावंगी येथील एका कृषी सेवा केंद्रावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात संशयित बोगस खतांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मा. आयुक्त (कृषी) महाराष्ट्र राज्य सुरज मांढरे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., मा. संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) कृषी आयुक्तालय पुणे सुनील बोरकर, मा. विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर सुनील वानखेडे, मा. वासुदेव सोळंके (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) तसेच मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. 28 जून 2026 रोजी ओम कृषी सेवा केंद्र, लाडसावंगी, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर येथे कृषी विभागाच्या गुण नियंत्रण शाखेच्या भरारी पथकाने तपासणी केली. यावेळी इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीच्या नावाने विक्रीस ठेवलेले संशयित बोगस म्युरेट ऑफ पोटॅश (MOP) खत तसेच ईल्लिनोइस् केमिकल अँड फर्टीलायझर, गोरेगाव, मुंबई या संस्थेच्या नावाने अनधिकृतरीत्या विपणन करण्यात आलेले संशयित बोगस एनपीके 10:20:20 दाणेदार मिश्र खत आढळून आले.
भरारी पथकाने विक्री केंद्र व गोदामाची सखोल तपासणी करून संशयित बोगस खतांचा साठा जप्त केला. संबंधित खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या कारवाईत कृषी विकास अधिकारी तथा खत निरीक्षक प्रकाश पाटील, मोहीम अधिकारी पंकज ताजने, खत निरीक्षक श्रीकृष्ण बंडगर, दिनकर जाधव व गोविंद पौळ यांनी सहभाग घेतला. कारवाईवेळी इंडियन पोटॅश लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी शिवाजी ठवरे उपस्थित होते.
शासनाच्या वतीने खत निरीक्षक गोविंद पौळ यांनी दि. 29 जून 2026 रोजी करमाड पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास करमाड पोलीस करीत आहेत.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खते खरेदी करण्याचे तसेच संशयास्पद खतांची विक्री आढळल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके

