कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील धाडसी प्रसंग; सीपीआर देत मुलीला दिले जीवदान, परिसरातून कौतुकाचा वर्षाव
कन्नड, प्रतिनिधी : “देव तारी त्याला कोण मारी” या म्हणीचा प्रत्यय कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे आला. विजेचा प्रवाह टीनच्या पत्र्यात उतरल्याने तीन निष्पाप चिमुकले जीवघेण्या संकटात अडकले असताना, शेख कालू शेख गनी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धाडसी बचावकार्य करून तिन्ही मुलांचे प्राण वाचवले. या शौर्यपूर्ण कृत्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, करंजखेड येथे राधा शेलार, सागर चौघुले आणि शारदा चौघुले हे तीन लहान मुले विजेचा प्रवाह आलेल्या टीनच्या संपर्कात आल्याने गंभीर संकटात सापडले होते. ही घटना लक्षात येताच तेथून जात असलेल्या शेख कालू यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्लास्टिकच्या पाईपचा वापर करून मुलांना विजेच्या प्रवाहापासून सुरक्षित दूर केले.
या घटनेत राधा ही मुलगी बेशुद्ध पडली होती. शेख कालू यांनी धैर्य आणि प्रसंगावधान दाखवत तिला तातडीने सीपीआर (CPR) दिला. काही वेळात तिचा श्वास पुन्हा सुरू झाला. त्यानंतर तिन्ही मुलांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठीही त्यांनी मदत केली. वेळेवर केलेल्या या मदतीमुळे तिन्ही चिमुकल्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात येत आहे.
शेख कालू यांच्या धाडसाचे करंजखेडसह परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, संकटसमयी दाखविलेल्या त्यांच्या मानवतेच्या आणि धैर्याच्या भावनेला नागरिकांनी सलाम केला आहे. अनेकांनी त्यांना सन्मानित करण्याची मागणीही केली आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके

