सोयगाव, प्रतिनिधी : अमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करत सोयगाव पोलिसांनी वेताळवाडी शिवारात सापळा रचून गांजाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोन संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईत सिल्लोड तालुक्यातील दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील गांजा जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सोयगाव पोलिसांनी वेताळवाडी परिसरात सापळा रचला. संशयित व्यक्ती तेथे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपी हे सिल्लोड तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा साठा कुठून आणला, तो कोणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सोयगाव पोलीस करीत आहेत.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र न्यूज टाइम्स
संपादक दिनेश गायके

