खुलताबाद, दि. २४ – (एस के शेख प्रतिनिधी)
खुलताबाद-फुलंब्री रोडवरील सराई गावाजवळ असलेल्या नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाच्या परिसरात एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीची ओळख बाळू उत्तम सोनवणे (वय ४०, रा. पिंप्री बुद्रुक, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी झाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घनकचरा प्रकल्प परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी पाठविण्यात आला आहे.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हा मृत्यू नैसर्गिक आहे की अन्य काही कारणामुळे झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
– महाराष्ट्र न्यूज टाइम्स

