पैठण, दि. 23 जून – पैठण एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या 24 तासांच्या आत खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी उत्तर येथील जुना बसस्टँड परिसरात एका युवकाचा खून करून त्याचा मृतदेह काटेरी झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीपर्यंत मजल मारली.
तपासादरम्यान मयत युवकाची ओळख प्रफुल्ल भास्कर ससदकर (रा. संजयनगर, कापूसवाडी, ता. पेठण) अशी पटली. पुढील चौकशीत अल्पवयीन मुलगा सोहेल अजीज शेख याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत यांच्यात पूर्वीपासून मैत्री होती. घटनेच्या दिवशी दोघेही जायकवाडी परिसरात गेले असता किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात आरोपीने प्रफुल्ल ससदकर याच्यावर दगडाने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह काटेरी झुडपांमध्ये लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पेठण पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.फास्ट ट्रॅक

