

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महिला व मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत शहर पोलीस दलाच्या दामिनी पथकाने हर्सूल तलाव परिसरात विशेष पेट्रोलिंग मोहीम राबविली. जटवाडा रोडवरील हर्सूल तलाव परिसराची पाहणी करून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान महिला हेडकॉन्स्टेबल कल्पना खरात, महिला पोलीस अंमलदार शिता ढाकणे आणि महिला पोलीस अंमलदार मोनिका दिवे यांनी परिसरात गस्त घालत नागरिकांशी संवाद साधला. तसेच महिला व मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास, छेडछाड अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
दामिनी पथकाच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महिला सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सातत्याने दक्ष असल्याचा संदेश देण्यात आला. शहरातील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे पेट्रोलिंग पुढेही नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

