वैजापूर, दि. २२ जून : वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाट परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने नाले-ओढ्यांना पूर आला आणि अनेक ठिकाणी पाणी साचले.
या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शिऊर बंगला ते नांदगाव या मार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला बसला. या मार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू असताना आलेल्या प्रचंड पाण्याच्या लोंढ्यामुळे पूल पूर्णपणे वाहून गेला. परिणामी हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील ओढे आणि नाल्यांना पूर आल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले तरी पुलाचे नुकसान आणि वाहतूक खंडित झाल्याने स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित विभागाकडून नुकसानीचा पंचनामा करण्यासह पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तलवाडा घाट परिसरातील या घटनेमुळे पावसाच्या पहिल्याच मोठ्या सरीने विकासकामांच्या गुणवत्तेचा प्रश्नही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

