खुलताबाद/फुलंब्री, दि. २२ जून : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनने खुलताबाद परिसरात दमदार हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे. जून महिना संपत आला असताना झालेल्या या मुसळधार पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले असून बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला आहे.
खुलताबाद शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून रखडलेली शेतीची कामे आणि पेरणीची तयारी आता वेगाने सुरू होणार आहे.
दरम्यान, फुलंब्री तालुक्यातही काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळताच लहान मुलांनी घराबाहेर पडून पावसात भिजण्याचा आनंद लुटला. रस्त्यांवर आणि मोकळ्या मैदानांमध्ये मुलांचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेकांनी पावसाचे स्वागत करत मान्सूनच्या आगमनाचा आनंद व्यक्त केला.
दुसरीकडे, जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरूळ परिसरात मात्र ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात झाला, परंतु पावसाच्या केवळ तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे वेरूळ परिसरातील नागरिक आणि शेतकरी अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मान्सूनच्या या पहिल्या दमदार आगमनामुळे खुलताबाद–फुलंब्री परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काही दिवसांत आणखी चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
— प्रतिनिधी, महाराष्ट्र न्यूज टाइम्स



