छत्रपती संभाजीनगर, दि. २२ जून : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व पाणी निचऱ्याच्या समस्या टाळण्यासाठी रस्त्यांवरील अडथळा ठरणारे विद्युत पोल तातडीने स्थलांतरित करण्यात यावेत तसेच सर्व नाल्यांची साफसफाई निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरील पोल शिफ्टिंगच्या कामांचा आढावा घेतला. पैठण गेट ते गुलामंडी, सतीश मोटर्स ते महात्मा फुले चौक आणि महात्मा फुले चौक ते शाहू महाराज चौक या मार्गांवरील विद्युत पोल स्थलांतराची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर झोन क्रमांक १ ते १० मधील सर्व झोन अभियंत्यांसोबत नालेसफाईबाबत बैठक घेण्यात आली. शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण करण्याबरोबरच नाल्यांतून काढण्यात आलेला गाळ त्वरित उचलण्याचे आदेश देण्यात आले. गाळ रस्त्यावर पडून राहिल्यास नागरिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच नाल्यांवरील अतिक्रमणे हटवून पावसाळ्यापूर्वी पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचनाही अनिल मकरिये यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

