पैठण | प्रतिनिधी
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याकडे ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल तात्काळ अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी पैठण तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत थकीत पेमेंट तातडीने देण्याची मागणी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी इशारा दिला की, थकीत रक्कम लवकरात लवकर मिळाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. प्रशासनाकडून शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


