छत्रपती संभाजीनगर, दि. २० जून – महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाने मोठ्या थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई करत एका दिवसात तब्बल १७ मालमत्ता सील केल्या असून ९२ लाख ७० हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व १० झोनमध्ये विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली.
आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून वसुली पथकांना कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार दिवसभर झोननिहाय पथकांनी थकबाकीदार मालमत्तांवर भेटी देत वसुलीची मोहीम राबवली.



झोननिहाय कारवाई
झोन १ : १ मालमत्ता सील, १३.६० लाख रुपये वसूल
झोन २ : १ मालमत्ता सील, १ लाख रुपये वसूल
झोन ३ : २ मालमत्ता सील; २५.५४ लाख रुपयांची थकबाकी असलेल्या मालमत्तांवर कारवाई
झोन ४ : ३ मालमत्ता सील, ४.६० लाख रुपये वसूल
झोन ५ : ६ मालमत्ता सील, १९.०९ लाख रुपये वसूल
झोन ६ : ३ मालमत्ता सील, १३.६५ लाख रुपये वसूल
झोन ७ : ३ मालमत्ता सील, ३.७५ लाख रुपये वसूल
झोन ८ : १ मालमत्ता सील, ३६.७५ लाख रुपये वसूल
झोन १० : ३ मालमत्ता सील, ३ लाख रुपये वसूल
महानगरपालिकेच्या या विशेष मोहिमेत दिवसभरात ७३ मालमत्तांना भेटी देण्यात आल्या. कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेत १७ मालमत्तांवर सीलची कारवाई करण्यात आली.
महापालिका प्रशासनाने मालमत्ता धारकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले असून थकबाकीदारांविरोधातील मोहीम पुढील काळातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

