छत्रपती संभाजीनगर, दि. २१ जून – जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि असामाजिक कृत्यांवर लगाम घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने राबविलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. अवघ्या १२ तासांत विविध ठिकाणी धडक कारवाया करत पोलिसांनी ७३ गुन्हे दाखल करून ७७ आरोपींना अटक केली असून तब्बल २ कोटी ३२ लाख ४ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या देखरेखीखाली २० जून रोजी सायंकाळी ६ ते २१ जून रोजी पहाटे ६ या कालावधीत जिल्हाभर ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
अवैध वाळू तस्करांवर मोठा घाव
गौण खनिज चोरी व अवैध वाहतुकीप्रकरणी ८ गुन्हे दाखल करून ११ वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईत १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यापूर्वी जप्त केलेल्या ६० वाहनांबरोबरच १२ चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात आला असून नव्याने जप्त वाहनांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हातभट्टी व अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई
गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांविरोधात ९ गुन्हे दाखल करून ९ आरोपींना अटक करण्यात आली. १,११० लिटर दारू, रसायने व साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. त्याचबरोबर विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या ३१ आरोपींविरोधात ३१ गुन्हे दाखल करून ६८५ बाटल्या जप्त करण्यात आल्या.
जुगार अड्ड्यांवर धाड
जुगार खेळणाऱ्या २० जणांना ताब्यात घेऊन ८ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत रोख रक्कम आणि १० मोटारसायकलींसह ५.३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शस्त्रसाठा जप्त
घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करत पोलिसांनी २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि एक तलवार जप्त केली. याप्रकरणी २ गुन्हे दाखल करण्यात आले.

गुटखा व गोवंश तस्करीविरोधात कारवाई
प्रतिबंधित गुटखा व सुगंधित जर्द्याच्या वाहतुकीप्रकरणी ६ गुन्हे दाखल करून १२.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गोवंश तस्करी व कत्तलीच्या दोन प्रकरणांत ३ आरोपींना अटक करून २४ जनावरांची सुटका करण्यात आली. त्यांना सुरक्षित गोशाळेत पाठविण्यात आले.

वाहतूक नियमभंगावरही कारवाई
दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अवैध धंदे, तस्करी व गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. पुढील काळातही नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन आणि विशेष मोहिमांद्वारे अशाच कठोर कारवाया सुरू राहतील.
या व्यापक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसांच्या धडक मोहिमेची जिल्हाभर चर्चा सुरू आहे.

— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

