छत्रपती संभाजीनगर, दि. २१ जून – जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधत छत्रपती संभाजीनगरातील सुमारे १०० स्थानिक कलाकारांनी एकत्र येत संगीत, कला आणि संस्कृतीचा अद्भुत संगम घडवून आणला. महानगरपालिकेच्या सहकार्याने रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तुडुंब गर्दी केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे, विश्वनाथ ओक, लक्ष्मीकांत काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
अवघ्या सहा दिवसांच्या तयारीत स्थानिक कलाकारांनी कोणताही मोबदला न घेता एक भव्य आणि दर्जेदार कलाकृती साकारली. कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. त्यानंतर नाट्यगीत, बंदिश, तराना, अभंग, लोकसंगीत, वासुदेव, भारूड, गोंधळ आणि लावणी अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. मराठी व हिंदी गीतांसह गझल आणि पश्चिमात्य रॉक बँडच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली.
स्वरानुभूती आणि तालवाद्य कचेरीमधून वादकांनी आपल्या कौशल्याची अप्रतिम झलक दाखवून दिली. स्थानिक कलाकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि इतक्या उच्च दर्जाचे सादरीकरण करू शकतात, याचा प्रत्यय उपस्थित रसिकांना आला.
या उपक्रमामागील संकल्पनेला महापौर समीर राजूरकर तसेच महानगरपालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रात एखाद्या शहरातील १०० कलाकारांनी एकत्र येऊन पूर्णपणे विनामोबदला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची ही दुर्मीळ घटना ठरली.
जागतिक संगीत दिनानिमित्त शहरातील विविध संगीत आणि सांस्कृतिक समूहांतील कलाकारांनी एकत्र येऊन साकारलेली ही आनंदयात्रा रसिकांच्या कायम स्मरणात राहणारी ठरली. यापुढे दरवर्षी संगीत दिनानिमित्त अशाच स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प कलाकारांनी व्यक्त केला. यासाठी महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी दिले.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स


