योगसाधनेतून अन्वीने दिव्यांगत्वावर केली मात
मुंबई, दि. 19 – प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित आणि ‘रबर गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखली जाणारी दिव्यांग योगसाधिका अन्वी विजय झांझूकिया हिने आपल्या जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दिव्यांगत्वावर यशस्वी मात करत देशभरातील युवकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी तसेच मंत्रालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात अन्वीने आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. देशभरातील ५० हून अधिक योग स्पर्धांमध्ये सहभागी होत तिने ५० पेक्षा अधिक पदके पटकावली आहेत. तसेच २०० हून अधिक योगासने करण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले आहे. दिव्यांगत्वाला न जुमानता योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उल्लेखनीय कार्य ती करत आहे.
यावेळी नुकत्याच चंदीगड येथे झालेल्या अखिल भारतीय नागरी सेवा योगासन स्पर्धा २०२५-२६ मधील महाराष्ट्राच्या विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. ४० ते ५० वर्षे वयोगटात शुभांगी चिकटे यांनी प्रथम क्रमांक, ४० वर्षांखालील गटात श्रीकांत घोलकर यांनी द्वितीय क्रमांक, तर ५० वर्षांवरील गटात दत्तात्रय सावंत आणि जगन्नाथ लांडगे यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक पटकावत महाराष्ट्राचा गौरव वाढविला.
या सर्व विजेत्यांनी मंत्रालयात योगाची प्रात्यक्षिके सादर केली. अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सचिवालय जिमखान्याच्या योग शाखेच्या सचिव अर्पणा जाधव याही यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमात योगा इन्स्टिट्यूटचे समीर व्यास यांनी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योगाचे प्रशिक्षण दिले. नियमित योगाभ्यासातून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
योग ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची साधना नसून आत्मविश्वास, मानसिक बळ आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्याची शक्ती देणारी जीवनपद्धती आहे, हे अन्वी झांझूकिया हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे.

