छत्रपती संभाजीनगर, दि. 18 (प्रतिनिधी): महानगरपालिकेच्या सीबीएसई पॅटर्ननुसार चालवल्या जाणाऱ्या शाळांमधील ज्युनिअर केजी (सन 2026-27) प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होत असून, प्रवेश अर्जांचे वाटप सोमवार, दि. 22 जून ते बुधवार, दि. 24 जून 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे.
महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार तसेच उपआयुक्त अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे आणि प्रशासन अधिकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अर्जांचे वाटप सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
खालील सहा महानगरपालिका शाळांमध्ये ज्युनिअर केजी प्रवेश अर्ज उपलब्ध राहतील :
🔹 मनपा शाळा, उस्मानपुरा
🔹 मनपा शाळा, प्रियदर्शनी इंदिरानगर
🔹 मनपा शाळा, गारखेडा (जवाहर कॉलनी)
🔹 मनपा शाळा, चेलीपुरा
🔹 मनपा शाळा, एन-7
🔹 मनपा शाळा, एन-11
महानगरपालिकेच्या सीबीएसई पॅटर्न शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याने पालकांचा या शाळांकडे वाढता कल दिसून येत आहे. इच्छुक पालकांनी विहित कालावधीत संबंधित शाळांमधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावेत, असे आवाहन सीबीएसई समन्वयक शशिकांत उबाळे यांनी केले आहे.
— महाराष्ट्र न्यूज टाइम्स

